न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२४) :- राज्यातील मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या २३ जानेवारीपासून या सर्वेक्षणाला राज्यभरात एकाच वेळी सुरुवात होणार असून ३१ जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश राज्य मागासवर्ग आयोगाने सर्व जिल्ह्यांना दिले आहेत.
यासाठी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेने तयार केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये ही माहिती भरली जाणार आहे. यासाठीचे प्रशिक्षण प्रगणक व पर्यवेक्षकांना देण्यात येणारे प्रशिक्षण २० व २१ रोजी पूर्ण करण्यात येणार आहे. १५४ प्रश्नांचा समावेश असलेल्या एका प्रश्नावलीतून हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी घरोघरी सर्वेक्षण करण्यात येणार असून प्रत्येकी दीडशे ते दोनशे घरांसाठी एका प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या १५ प्रगणकांमागे एक पर्यवेक्षक नेमण्यात येणार आहे. गुरुवारी व शुक्रवारी मुख्य प्रशिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण केले जाणार आहे.
हे मुख्य प्रशिक्षक २० जानेवारीला जिल्हा तसेच महापालिका स्तरावर प्रशिक्षण देतील. सर्वेक्षणाचे हे काम २३ ते ३१ जानेवारी या कलावधीत पूर्ण करण्याचे निर्देश राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेले आहे. सर्वेक्षणात मिळालेली माहिती एकत्र करून त्याचे वर्गीकरण तसेच त्यातील चुकांची दुरुस्ती केली जाणार आहे. त्याचप्रमाणे सर्वेक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाने १९ जानेवारीपर्यंत नागरिकांच्या सूचना मागविल्या होत्या. सर्वेक्षण दरम्यान या सूचनांचा देखील अंतर्भाव करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी यावेळी दिली.











