- कलारंग व विश्व हिंदू परिषद आयोजित भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न…
- स्पर्धेचा लवकरच पारितोषिक वितरण समारंभ – अमित गोरखे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२४) :- कलारंगचे अध्यक्ष अमित गोरखे यांच्या संकल्पनेतून तसेच विश्व हिंदू परिषद पिं.चिंचे अध्यक्ष धनंजय गावडे यांच्या सहयोगाने अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या आगमनानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धा आज शनिवारी (दि. २०) रोजी नॉवेल इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित करण्यात आली होती. यात पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास ३२ शाळांमधील इयत्ता सहावी ते बारावी मधील १२२७ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला.

या स्पर्धेमध्ये रामायणातील श्रीराम व शबरी भेट, श्रीराम व केवट भेट, नल नील व प्रभू श्रीराम, रावण वध, आपल्याला आवडणारा “रामायणा ” मधील प्रसंग आशा विविध विषयांवरील चित्रांचा समावेश होता.
२२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्री राम यांचे भव्य दिव्य असे मंदीर उभारले जात आहे. त्या मंदिरात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्यानिमित या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संपुर्ण वातावरण राममय झाले होते.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक दिवंगत आमदार कै. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ रोख १५,००० रुपये व स्मृतिचिन्ह, द्वितीय पारितोषिक कै. हिराबाई किसनराव लांडगे यांच्या स्मरणार्थ रूपये १०,००० रुपये व स्मृतिचिन्ह, तृतीय पारितोषिक कै. गणपतराव गोरखे यांच्या स्मरणार्थ रोख ७,५०० रुपये व स्मृतिचिन्ह, चतुर्थ पारितोषिक कै.सुरेश गादिया यांच्या स्मरणार्थ रोख ५,००० रुपये व स्मृतीचिन्ह, कै. सुनंदा यशवंत मिठभाकरे यांच्या स्मरणार्थ रोख २१०० रुपये व स्मृतिचिन्ह ठेवण्यात आले आहे. लवकरच या बक्षिसांचे वितरण देखील करण्यात येणार आहे. तसेच या सर्व चित्रांचे प्रदर्शन देखील ठेवण्यात येणार आहे.
या स्पर्धेला रा.स्व.संघाचे हेमंत हरहरे, निगडी प्राधिकरण माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, पिं.चि विश्व हिंदू परिषद अध्यक्ष धनंजय गावडे, जिल्हा सहमंत्री विशाल मासुळकर, विभाग मंत्री नितीन वाटकर, मा.नगरसेविका अनुराधा गोरखे, भाजपा पदाधिकारी कैलास कुटे, गणेश लंगोटे, मनिषा शिंदे आदी उपस्थित होते.
सर्व स्पर्धकांचे, परीक्षकांचे, पाहुण्यांचे कलारंगाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी आभार मानले.
—-












