प्राणप्रतिष्ठापनादिनी थेट अयोध्येतून श्री रामलल्लाची मूर्ती अवतरणार..
तमाम रामभक्त आणि रहाटणीकरांनी उत्सवात सहभागी व्हावे – मा. नगरसेवक चंद्रकांत नखाते…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जानेवारी २०२४) :- अयोध्यामध्ये सोमवारी श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. देशभर राम भक्तांमध्ये उत्साहाचे, आनंदाचे वातावरण आहे. हा आनंद द्विगुणीत करण्यासाठी मा. नगरसेवक चंद्रकांत नखाते आणि युवा नेते शुभम नखाते यांच्या वतीने रहाटणीमध्ये एक लाख भगव्या पताकांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे अवघी रहाटणी राममय झाली आहे. याशिवाय विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
थेट अयोध्यातील प्रभू श्रीरामांच्या ३१ मुर्तींपैकी एक मूर्ती मंदिर ट्रस्टच्या वतीने भक्तांच्या दर्शनासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. त्या मूर्तीच्या दर्शन सोहळ्याचा आणि शोभायात्रेचा प्रारंभ सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत रहाटणीफाटा येथून रहाटणी गावापर्यंत होणार आहे. अयोध्येत पार पडणाऱ्या भव्य श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहोळ्याचे थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर होणार आहे. त्यामाध्यमातून हजारो लोकांना या सोहळ्याचे साक्षीदार होता येणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता शेकडो दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर सात वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. दिवसभर सुरू असणार्या या कार्यक्रमाची सांगता प्रभू श्रीरामाच्या आरतीने सायंकाळी ७.३० वाजता करण्यात येणार आहे.
प्रभू श्रीराम मंदिरासाठी ५०० वर्षांपासून भारतीयांना प्रतीक्षा करावी लागली आहे. पिंढ्यांन् पिढ्यांनी पाहिलेले स्वप्न आता सत्यात उतरत आहे. या निमित्त आम्ही रहाटणीत विविध धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम घेतले आहेत. राम मंदिर राष्ट्रार्पण दिनाच्या या दिमाखदार सोहळ्यात आपल्या दारासमोर रांगोळी, पणती, आकाशकंदील, आणि भगवा झेंडा उभारून तमाम रामभक्त आणि रहाटणीकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक चंद्रकांत नखाते यांनी केले आहे.











