- इच्छुक जागा मालकांकडून मागविले अर्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२४) :- राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत शहरातील विविध ३५ ठिकाणी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र व हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तत्काळ कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील विविध ठिकाणी जागा भाडेतत्वार घेण्यात येणार आहे. या अनुषंगाने शहरातील विविध भागातील इच्छुक जागा मालकांचे अर्ज मागविण्यात आले आहेत.
शहरी भागातील दाटीवाटीने वसलेल्या भागापासुन ते झोपडपट्टी वस्तीपासून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर जास्त आहे. तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामकाजाच्या अयोग्य वेळेमुळे, काही झोपडपट्ट्या व झोपडपट्टी सदृश भाग आरोग्य सेवांपासून वंचित राहत आहेत. राज्यातील दवाखाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्मार्ट बनविणे, सातत्यपूर्ण आरोग्य गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करणे, विविध रोगांच्या प्रादूर्भावाचे निरीक्षण आणि नियंत्रण करणे, सुलभ आणि परवडणारी जागतिक दर्जाची दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करून संपूर्ण समाजाचा आरोग्य निर्देशांक वाढविणे हा हेतू नागरी आरोग्य वर्थिनी केंद्र व हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रमाचा आहे.
याद्वारे गरजू रुग्णांना सेवा देण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत ३५ ठिकाणी हे सुरू करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे, नियम, अटी शतींची पूर्तता करून क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित क्षेत्रीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या नावाने बंद पाकिटामध्ये १३ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.











