- वंचितचा मविआत समावेश करत असल्याचं पत्र जारी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२४) :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून जोरात तयारी सुरू झाली आहे. तसंच, सत्ताधाऱ्यांविरोधात मोट बांधण्याकरता अनेक लहान-मोठ्या पक्षांना आघाडीत सामील करून घेतले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत सामील होण्याकरता वंचित बहुजन आघाडीकडून इच्छा व्यक्त केली जात होती.
भाजपाविरोधात आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असं वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं होतं. परंतु, महाविकास आघाडीतील इतर घटकपक्षांबरोबर वंचितचे असलेले राजकीय मतभेद पाहता हे गणित जुळून येणे कठीण होते. परंतु, आज (दि. ३०) वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करून घेतले आहे. वंचितचा मविआत समावेश करत असल्याचं पत्र जारी करण्यात आलं.
गुरुवारी झालेल्या मुंबईतील महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामील व्हावं यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं एकमत झालं असून वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला असल्याचं या पत्रात म्हटलं आहे. महाविकास आघाडीची पुढची बैठक ही २ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी वंचितच्या वतीने प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर हे स्वतः त्यासाठी हजर राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
वंचितची महाविकास आघाडीमध्ये सामील करण्यासंदर्भात अधिकृत पत्र जारी करण्यात आलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्याला अद्याप अधिकृत पत्र प्राप्त झालं नाही, ते मिळाल्यावर भूमिका मांडू असं म्हटलं आहे.