न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ फेब्रुवारी २०२४) :- इलेक्ट्रिक वोटिंग मशीनच्या (ईव्हीएम) संदर्भात आलेली याचिका दाखल करून घेतानाच सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात म्हणणे मांडण्यासाठी केंद्र सरकारला नोटीस काढली आहे. पुण्यातून दाखल झालेल्या या याचिकेची सुनावणी आज बुधवारी (दि. ७) होणार आहे.
काँग्रेसचे पुण्यातील नेते, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड व प्रदेश कार्यकारिणी सदस्य रमेश अय्यर यांनी ही याचिका दाखल केली आहे. ईव्हीएम मशीनच्या व्हीव्हीपॅट स्लिपवर मतदानाची वेळ तसेच दिनांक प्रसिद्ध केला जावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला व न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. तत्पूर्वी न्यायालयाने केंद्र सरकारला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी नोटीस दिली आहे. छाजेड व अय्यर यांच्या वतीने अभय अनिल अंतुरकर, सुरभी कपूर आणि असीम सरोदे हे वकील सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत.
छाजेड यांनी सांगितले की, मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीनमध्ये ज्या व्हीव्हीपॅट स्लि स्लिप येतात, त्यावर झालेल्या प्रत्येक मतदानाची वेळ आणि तारीख छापून यावी, अशी आमची मागणी आहे.
तज्ज्ञ समितीची शिफारस डावलून निवडणूक आयोग व केंद्र सरकार स्लिपवर वेळ आणि दिनांक न टाकता निवडणूक घेत आहे. आता सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सरकार आणि निवडणूक आयोगाने ताळमेळ राखून तज्ज्ञ समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आम्ही याचिकेत केली आहे, असे अय्यर यांनी सांगितले.