न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ फेब्रुवारी २०२४) :- महाराष्ट्र परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी ची शिष्यवृत्तीची परीक्षा येत्या १८ फेब्रुवारी रोजी घेतली जाणार आहे. यंदा परीक्षेस दोन्ही इयत्तेचे एकूण १४ हजार १५० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
शहरात एकूण ७४ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेस शहरातील इयत्ता ५ वीच्या ३५२ व इयत्ता ८ वी च्या २७० शाळांनी शिष्यवृत्ती परीक्षेस विद्यार्थ्यांना बसविले आहे.
परीक्षेसाठी आवश्यक असणारे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेस्थळावर २ फेब्रुवारी रोजी उपलब्ध करून देण्यात आले आहे. स्कूल लॉगिन करून विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्राची प्रिंट काढून मुख्याध्यापकांच्या सही शिक्यानिशी प्रमाणित करून विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आले आहे. सदर परीक्षेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून दहा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.