न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ फेब्रुवारी २०२४) :- केंद्रीय निवडणूक आयोगाने ६ फेब्रुवारी रोजी मोठा निकाल दिला. त्यानुसार, अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं.
त्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षनाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार गटाकडे गेले आहे. परिणामी नव्या नावासाठी शरद पवार गटाला आजच्या सायंकाळपर्यंत तीन नाव सुचवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ असं नाव देण्यात आलं.
परंतु, हे नाव २७ फेब्रुवारीपर्यंत मर्यादित राहणार आहे. २७ फेब्रुवारीनंतर शरद पवार गटाला पुन्हा निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा लागणार आहे, अशी माहिती अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली. येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत, अर्थात राज्यसभा निवडणुका पार पडेपर्यंत हे नाव वैध असेल, असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.