न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२४) :- केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या महाराष्ट्रासह १५ राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या २७ फेब्रुवारी रोजी ही निवडणूक होणार आहे. उमेदवारांना १५ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येईल. दरम्यान, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नुकताच राजस्थानमधून राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर सर्वच पक्षांनी राज्यसभेसाठी उमेदवारांची नावं जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. काही वेळापूर्वी भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील तीन राज्यसभा उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.
महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी देऊ केली आहे. तर ज्यांच्या नावाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती, त्या पकंजा मुंडेंना मात्र यावेळी वगळण्यात आले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कालच (१३ फेब्रुवारी) भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आज त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्याचबरोबर कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना २०१९ मध्ये विधानसभेसाठी उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर त्या काहीशा नाराज होत्या. त्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडेही आपली तक्रार नोंदविली होती. आज राज्यसभेसाठी त्यांना उमेदवारी देऊन भाजपाने एकप्रकारे त्यांचे पुर्नवसन केल्याचे दिसत आहे. शिंदे गटाकडून मिलिंद देवरांना मोठं गिफ्ट मिळालं असून त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे.
एक दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल या अपेक्षित निर्णयाबरोबरच नांदेड जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञ डॉ. अजित गोपछेडे यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे नांदेड जिल्ह्यातील दोघांना खासदारकी मिळणार आहे. या अनपेक्षित निर्णयाबरोबरच बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडे समर्थकांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. डॉ. गोपछेडे वैद्यकीय संघ परिवारातील वैद्यकीय आघाडीचे काम करतात. लिंगायत समाजाच्या मतांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे, असा संदेश त्यांच्या उमेदवारीनंतर राजकीय पटलावर चर्चेत आहे.