न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. १५ फेब्रुवारी २०२४) :- देहू-आळंदी रस्त्यावरील विठ्ठलवाडी ते देहू कमान दरम्यान खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकींचे सतत अपघात होत असून रात्री जड वाहने खड्ड्यात आदळत आहेत. देहू नगरपंचायतीने तातडीने रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
देहू नगरपंचायतीने पाण्याच्या वाहिनीसाठी बऱ्याच ठिकाणी क्रॉसिंग करून जलवाहिनी टाकली आहे. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. दोन वर्षांपासून ही परिस्थिती आहे.
तातडीने रस्ता दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. याशिवाय देहू-आळंदी पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना देखील खूपच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे देहू नगरपंचायतीने या रस्त्याची दुरुस्ती अथवा डांबरीकरण करावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.















