- ‘रिटर्न’ तिकीट सेवा पुन्हा सुरु करण्याची होतेय मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२४) :- मेट्रो प्रशासनाने परतीच्या प्रवासाची (रिटर्न) तिकीट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. १ मार्चपासून ही सेवा बंद होणार आहे. मेट्रो प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना आता जाताना आणि येताना वेगळे तिकीट काढावे लागणार आहे. यात प्रवाशांचा वेळ वाया जाणार आहे.
‘महामेट्रो’ने वनाज ते रुबी हॉल आणि पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट असा ऑगस्टमध्ये विस्तार केला. त्यानंतर मेट्रोची प्रवासी संख्या वेगाने वाढली. दिवसाला साधारण ५० ते ५५ हजार प्रवासी मेट्रोमधून प्रवास करत आहेत. प्रवाशांना मेट्रोतून प्रवास करण्यासाठी मेट्रोचे अॅप, व्हॉट्सअॅप क्रमांक, एटीव्हीएम मशीनच्या माध्यमातून तिकीट काढण्याची सोय आहे. प्रत्येक मेट्रो स्थानकावर तिकीट काउंटर आहे. या काउंटरवर सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेस तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागतात.
प्रवासा दरम्यान वेळ वाचावा म्हणून आणि दोनदा तिकीट काढण्यासाठी काउंटरवर किंवा एटीव्हीएम मशीनवर जाऊन तिकीट काढण्यापेक्षा बरेच नागरिक एकदाच परतीचे (रिटर्न) तिकीट काढतात. पण, मेट्रो प्रशासनाने आता १ मार्चपासून रिटर्न तिकीट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मेट्रो प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना आता जाताना आणि येताना वेगळे तिकीट काढावे लागणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जाणार आहे. मेट्रो प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे, मेट्रोला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवासी बऱ्याच वेळा रिर्टन तिकीट काढून कुठल्या तरी स्थानकावर उतरून नंतर मेट्रोमध्ये बसून येत होते. पण त्यांना आता या सुविधेचा लाभ घेता येणार नाही, त्यांना दोन वेळा तिकीट काढावे लागणार आहे, त्यामुळे मेट्रोने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी होत आहे.
प्रवासी ब-याच वेळा रिटर्न तिकीट काढून मध्येच कोणत्याही स्थानकावर उतरणे, दुसऱ्या स्थानकावर आउट न करता पुन्हा रिटर्न येणे अशा कारणांमुळे बाहेर पडताना तांत्रिक अडचणी येत होत्या. काही वेळा दंडही भरावा लागत होता, त्यामुळे मेट्रो प्रशासनाने रिटर्न तिकीट सेवा बंद करण्यावा निर्णय घेतला आहे.
– हेमंत सोनावणे, जनसंपर्क अधिकारी, मेट्रो











