न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२४) :- खेड न्यायालयाने अभूतपूर्व असा निकाल देत सुनावणीच्या पहिल्याच तारखेस घटस्फोट मंजूर केला. महत्वाची बाब म्हणजे राजा व राणी (नावे बदलली आहेत) यांचा दिनांक १० मे २०२२ रोजी विवाह झालेला होता. परंतु, विवाहपश्चात एका महिन्यातच दोघांनाही परस्परांचे स्वभाव, आवडी-निवडी आणि आयुष्याविषयीचा दृष्टीकोन वेगवेगळा असल्याचे निदर्शनास आलेले होते.
मित्र, नातेवाईक यांनी दोघांची समजूत काढूनही दोघेही एकत्र न येण्याच्या निर्णयावर ठाम होते. यातच दोघांनीही परस्पर समझोत्याने विभक्त होण्याचा व्यवहारिक निर्णय घेतला. त्याबाबत त्यांनी खेड न्यायालयात कार्यरत वकील अॅड. आकाश प. चोरडिया, अॅड. ऐश्वर्या स. शेवकरी, अॅड. दिपाली स. सहाने यांचेमार्फत दि. १४/०२/२०२४ रोजी विवाह याचिका दाखल केलेली होती. त्यावर दिनांक २२/०२/२०२४ रोजी पहिली सुनावणी नेमण्यात आलेली होती.
सदर विवाहित दांम्पत्याचा समजूतदारपणाच्या भूमिकेस दाद देत मा. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर खेड (श्री.एम.बी.पाटील) यांनी एकाच दिवसात घटस्फोट मंजूर करत दोघांनाही वैयक्तित बंधनातून मुक्त केलेले आहे.











