न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पनवेल (दि. २३ एप्रिल २०१९) :- ज्या उमेदवाराचे मतदान मावळ लोकसभा मतदार संघात नाही, असा उमेदवार मावळच्या जनतेवर लादण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बारामतीहून पाठवलेले हे पार्सल मावळ लोकसभा मतदारसंघातील मावळा परत बारामतीला पाठवणार आहे; असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
तसेच मावळची जनता मतदान श्रीरंग बारणे यांना करेल, पण त्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांना ताकद मिळेल. ही निवडणूक भारताच्या अस्मितेची, राष्ट्रीय सुरक्षेची, विकासाची निवडणूक आहे, असेही फडणवीस म्हणाले.
भाजपा, शिवसेना, रिपाइं (ए), राष्ट्रीय समाज पार्टी, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल मधील कामोठे येथे जाहीर सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
यावेळी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, खासदार श्रीरंग बारणे, महापौर डॉ. कविता चौटमल, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, कोकण म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, संपर्क प्रमुख दत्ता दळवी, जगदीश गायकवाड, उपमहापौर विक्रांत पाटील, बबनदादा पाटील, अरुण भगत, दिलीप पाटील, सुशील शर्मा, महेश बालदी आदी उपस्थित होते.











