- महिला दिनानिमित्त आज महिलांना करता येणार पीएमपी बसने मोफत प्रवास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मार्च २०२४) :- महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना घोराडेश्वराच्या दर्शनाला जाता यावे, यासाठी पीएमपीएमएलच्या वतीने निगडी येथून विशेष बस सोडण्यात येणार आहे. तसेच इतर बसही जाणार असून दर ते १० ते १५ मिनिटांनी बस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले. निगडी (पवळे चोक) येथून घोराडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) पर्यंत बससेवा असेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. एकूण २० बस सरासरी १० ते १५ मिनिटांनी उपलब्ध होणार आहे.
तसेच जागतिक महिला दिनानिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात काही मार्गावर महिलांना मोफत बससेवा देण्यात येणार आहे. दि. ८ मार्च रोजी शहरातील १७ मार्गावर दिवसभर ही मोफत सेवा दिली जाणार असून, महिलांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रत्येक बसमध्ये महिलांसाठी राखीव जागाही ठेवण्यात आलेली आहे.
मोफत सेवा (कंसात मार्ग क्रमांक)…
मार्केटयार्ड ते पिंपळेगुरव (११), आकुर्डी रेल्वे स्टेशन ते मनपा (३२२), निगडी ते मेगा पॉलीस हिंजवडी (३७२), भोसरी ते निगडी (३६७), चिखली ते डांगे चौक (३५५) यासह पुण्यातील स्वारगेट ते हडपसर (३०१), स्वारगेट ते धायरेश्वर मंदिर (११७), शनिवारवाडा ते केशवनगर मुंढवा (१६९), कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन (९४). एनडीए गेट क्र.१० ते मनपा (८२), कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड (२४), कात्रज ते कोथरूड डेपो (१०३), हडपसर ते वारजे माळवाडी (६४), भेकराईनगर ते मनपा (१११), हडपसर ते वाघोली (१६७), अप्पर डेपो ते शिवाजीनगर (१३) या बसचा समावेश आहे











