- देहूत येणाऱ्या भाविकांना स्वच्छ पाणी द्या..
- अप्पर तहसीलदारांच्या प्रशासनाला सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. ०८ मार्च २०२४) :- संत तुकाराम महाराज ३७५ वा बीजसोहळा येत्या २७ मार्च रोजी देहुगावमध्ये संपन्न होत आहे, त्यानिमित्त कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक भक्तांची गर्दी होईल. येथे येणाऱ्या भाविकांना स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी गावातील जे मैलामिश्रित सांडपाणी इंद्रायणी नदीत मिसळत आहे. ते पाणी नदीत जाणार नाही, तसेच जलपर्णी काढून टाकावी आणि येणाऱ्या वारकरी भाविक भक्तांना स्वच्छ, निर्मळ पाणी मिळेल, मंदिराचा परिसर व घाट स्वच्छ राहील, याबाबत योग्य नियोजन करावे, अशा सूचना अप्पर तहसीलदार जयराज देशमुख यांनी देहूनगर पंचायतीला दिल्या.
श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या तयारीनिमित्त मंगळवार (दि. ६) रोजी देहूनगर पंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस पाठबंधारे विभाग, महावितरण, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वाहतूक विभाग, पीएमपीचे अधिकारी तसेच देहूनगर पंचायत व संबधित विभागाचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते. या वेळी पाणीपुरवठा विभाग, आरोग्य तसेच विद्युत पुरवठा विभाग या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी बीज सोहळ्यादरम्यान देहूनगरीत येणाऱ्या वारकरी भाविक भक्तांची कसलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी. तीन दिवस अगोदर तीन ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करावा, अशा सूचना देशमुख यांनी दिल्या.
बैठकीस देहु देवस्थान संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, माणिक महाराज मोरे,जयेश मोरे, पूजा दिवटे, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, योगेश परंडवाल, नगरसेवक योगेश काळोखे, प्रवीण काळोखे, तसेच दिनेश नरवडे, सूर्यकांत काळे, नगरसेविका सपना मोरे, पूनम काळोखे, प्रियांका मोरे, मीना कुन्हाडे, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, पोलिस निरीक्षक नितीन फटांगडे, तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
देहत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, याबाबत सर्व शासकीय, निमशासकीय विभागाने दक्षता घ्यावी. वाहतुकीबाबत योग्य नियोजन करावे. जेणे करून भाविक भक्त संत तुकाराम महाराज बीजसोहळा अनुभवण्यापासून वंचित राहणार नाही.
– माणिक महाराज मोरे, देहू देवस्थान संस्थान, विश्वस्त…











