न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२४) :- महिला सक्षमीकरणासाठी महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने सक्षमा प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या प्रकल्पातंर्गत ५ वर्षांमध्ये ५००० महिला बचत गटांना बळकट आणि सक्षम केले जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत बचत गटांना विविध व्यावसायिक गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाईल तसेच उपजिविकेचे स्तोत्र उपलब्ध करून दिले जाणार आहेत. महिला सक्षमीकरणामध्ये महिला बचत गटांची भूमिका महत्वाची असून २५० क्लस्टर आणि ०८ झोनल स्तरीय फेडरेशन अशा संस्थांमुळे बचत गटांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक सक्षमीकरण साध्य करता येणार आहे, असे आयुक्त शेखर सिंह म्हणाले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने शहरातील महिला बचत गटातील महिलांसाठी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह बोलत होते.
या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उप आयुक्त अजय चारठाणकर, सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, समाज विकास अधिकारी सुहास बहादरपुरे तसेच महापालिका कर्मचारी आणि महिला बचत गटांच्या महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, शहरातील महिलांना सक्षम करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेचा समाजविकास विभाग नेहमीच तत्पर असतो. बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी बचत गट मॉल ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. यामुळे महिलांना त्यांची उत्पादने बाजारात उतरविण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार असून शहरातील नागरिकांनाही दर्जेदार उत्पादने एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. बचत गटांना महापालिकेच्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने नवी दिशा या प्रकल्पामध्ये महिला बचतगटांद्वारे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची देखभाल करण्याचे काम करण्यात येत आहे. तसेच महापालिकेच्या वतीने सिद्धी प्रकल्प राबविण्यात आला. या प्रकल्पामध्ये मालमत्ता कर बिलाचे वाटप या बचत गटांद्वारे करण्यात आले. महिला बचत गटांच्या सहभागामुळे महापलिकेने तीन ते चार महिन्यांमध्ये ४४० कोटींपेक्षा जास्त मालमत्ता कर वसुल केला आहे. हा आकडा मागील वर्षीपेक्षाही जास्त आहे.
कौशल्यम प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या वतीने गरजू मुलींसाठी विविध कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामुळे त्यांना विविध क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन भेटत असून नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. कौशल्यम हा अशा प्रकारचा एक सहयोगी प्रकल्प आहे जो तरुणांच्या आकांक्षा आणि उद्योगाची मागणी यांच्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न आहे. कौशल्यम हे शहरातील तरुणांना सशक्त बनवण्याच्या आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना देण्याच्या वाटचालीतील एक महत्वाचे पाऊल आहे. आपल्या शहराच्या उज्वल भविष्यासाठी लागणाऱ्या सामूहिक कृतीचे महत्त्व अधोरेखित करणारा हा एक सहकार्यात्मक प्रयत्न आहे. यासाठी येत्या काळात महापालिकेच्या वतीने प्रत्येक प्रभागात २ म्हणजे एकूण १६ लाईटहाऊस सेंटर सुरू करण्याचे नियोजन आहे. आता सध्या शहरात ६ लाईटहाऊस सेंटर्स आहेत जिथे तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जात आहे, असेही आयुक्त सिंह यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमात आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला बचत गटांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महिला बचत गटांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप आयुक्त अजय चारठाणकर यांनी केले तर सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार समाज विकास अधिकारी सुहास बहादरपुरे यांनी मानले.











