- आवास योजनेतील सोडतीत अपात्र ठरलेल्या अर्जदारांची ओरड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च २०२४) :- पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महापालिकेतर्फे आकुर्डी व पिंपरीत गृहप्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्यातील सदनिकांसाठी इच्छुकांनी महापालिकेकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज आणि दहा हजार रुपये अनामत जमा केली. मात्र, सोडतीत अपात्र ठरलेल्या अर्जदारांना दोन महिन्यांनंतरही अनामत परत करण्यात आलेली नाही. ती कधी जमा करणार, असा सवाल अर्जदार करत आहेत.
केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महापालिकेतर्फे शहरातील आर्थिक दुर्बल कुटुंबांसाठी आकुर्डी व पिंपरीत गृहप्रकल्प उभारण्यात येत आहेत. आकुर्डीतील आरक्षण क्रमांक २८३ व पिंपरीतील आरक्षण क्रमांक ७७ येथे घरे बांधण्याचा प्रकल्प राबविण्यात आला. त्यात ९३८ सदनिका आहेत. त्यासाठी नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. ऑनलाइन अर्जाची छाननी करून लाभार्थी निश्चित केले. ज्या इच्छुकांचे अर्ज बाद झाले आहेत, त्यांची दहा हजाराची अनामत रक्कम तीस दिवसांच्या आत परत करावयाची असते. मात्र सोडत होऊन दोन महिने उलटले तरीही ती रक्कम महापालिकेने परत केलेली नाही. त्यामुळे ती कधी जमा करणार, असा सवाल अर्जदार करत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेच्या मोहननगर (आकुर्डी) आणि पिंपर (उद्यमनगर) गृहप्रकल्पांसाठी एकूण १० हजार १०८ अर्ज आले होते. उद्यमनगर येथील गृहप्रकल्पातील एकूण ३७० सदनिकांसाठी ४ हजार ६३८ अर्ज तर, मोहननगर येथील ५६८ सदनिकांसाठी ६ हजार ६९३ अर्ज आले होते. यांच्याकडून प्रत्येकी १० हजाराची अनामत रक्कम तर ५०० रुपये अर्ज शुल्क असे एकूण १० हजार ५०० रुपये घेण्यात आले होते.
ज्या अर्जदारांनी पैसे भरले आहेत, त्यांच्या खात्यावर या आठवड्यात पैसे जमा होतील. तशा सूचना बँक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
– अण्णा बोदडे, सहायक आयुक्त, महापालिका…











