न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च २०२४) :- होळी सण आला, की चाकरमान्यांना ओढ लागते ती आपल्या गावी जाण्याची. परिणामी, सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या रेल्वे, एसटीच्या गाड्यांना प्रचंड गर्दी होते. हे लक्षात घेत, रेल्वे आणि एसटी प्रशासनाकडून अतिरिक्त विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. त्यामुळे पुण्यातून कोकण भाग आणि उत्तर प्रदेशात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोकण, उत्तर प्रदेश, बिहारसह अन्य भागांतून अनेक चाकरमानी कामधंद्यासाठी पुण्यात आलेले आहेत. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कार्यालयीन कामाला मिळालेल्या सुट्ट्यांमध्ये ते आपल्या गावी जातात. गणेशोत्सवासह होळीच्या सणालासुद्धा गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे रेल्वेच्या आणि एसटीच्या पुणे विभागाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
एसटीचे अतिरिक्त गाड्यांचे नियोजन…
एसटी प्रशासनाकडून अतिरिक्त ३० गाड्या कोकण भागासाठी सोडण्यात आल्या आहेत. यातील ९ गाड्या एसटीच्या स्वारगेट आगारातून, तर २१ पिंपरी-चिंचवड आगारातून सुटतील. स्वारगेटहून सुटणाऱ्या अतिरिक्त गाड्या सातारामार्गे चिपळूणसाठी, भोरमार्गे दापोली आणि भोरमार्गेच खेडसाठी धावतील; तर पिंपरी-चिंचवड आगारातून चिपळूण, गुहागर, देवरुख, रत्नागिरी, दापोली, खेड, पोलादपूर या ठिकाणी जातील. रेल्वेचे होळी विशेष गाड्यांचे नियोजन तसेच मध्य रेल्वेकडून २२ फेऱ्यांचे नियोजन केले आहे. यात कानपूरसाठी सावंतवाडीसाठी ४, ४ फेऱ्या दानापूरसाठी ४ फेऱ्यांचे नियोजन केले आहे. यासह पुण्यातून रेल्वेच्या गोरखपूरसाठी २ फेऱ्या, संबळपूरसाठी ६ फेऱ्या, मुजफ्फरपूरसाठी ६ फेऱ्या, दानापूरसाठी २ फेऱ्या होणार आहेत. यामुळे उत्तर प्रदेश आणि कोकण भागातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.











