न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२४) :- इंद्रायणी नदीत थेट सांडपाणी सोडून जलप्रदूषण करणाऱ्या सात गृहप्रकल्पांवर देहू नगरपंचायत प्रशासनाने कारवाई केली आहे. त्यांच्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या जलनिस्सारण वाहिन्या बंद केल्या आहेत. या प्रकरणी, संबंधित गृहप्रकल्पांनी लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही न केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा विचार प्रशासनाकडून केला जात आहे.
देहू नगरपंचायतीच्या हद्दीत अनेक गृहप्रकल्प झाले आहेत. तर नवीन प्रकल्प पूर्ण होत आहे. यातील काही गृहप्रकल्पांचे सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. त्यामुळे, इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणांत प्रदुषण होत आहे. नुकतेच इंद्रायणी नदीत मासे मृत झाले. त्याचप्रमाणे येत्या २७ तारखेला संत तुकाराम महाराज बीज आहे. या सोहळ्या निमित्त देहूत लाखो भाविक दाखल होणार आहेत. त्यामुळे, भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, याची खबरदारी नगरपंचायत प्रशासनाने घेत आहे.
याबाबत नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे म्हणाल्या, ‘‘सोसायटीधारक आणि गृह प्रकल्पांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्यात शंभरपेक्षा जास्त सदनिका असतील; तर त्यांनी स्वतःचा एसटीपी प्लँट उभारावा. तसेच त्यापेक्षा कमी असेल; तर त्यांच्यासाठीही सूचना देण्यात आल्या आहेत. सात गृहप्रकल्पांवर कारवाई केली आहे. त्यांचे नदीत सांडपाणी सोडणाऱ्या जलनिस्सारण वाहिन्या (आउट लेट चेंबर) बंद केले आहेत.’’
लहान गृहप्रकल्प अथवा सोसायट्यांनी स्वतःचे एसटीपी प्लँट उभारावेत. गृहप्रकल्पातील सांडपाणी जलनिस्सारण वाहिनीद्वारे एकाच ठिकाणी आणून नगरपंचायतीच्या एसटीपी प्लँटला जोडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.













