- तिथे कुत्र्यांचा कळप बिनधास्तपणे फिरताना दिसतोय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. २५ मार्च २०२४) :- जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांचा ३७५ वा बीज सोहळा बुधवारी (दि. २७) रोजी आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून भाविक देहूत दाखल होऊ लागले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे. संत तुकाराम महाराज संस्थान आणि देहू नगरपंचायत प्रशासन भाविकांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी सज्ज असल्याचा दावा करीत आहे. परंतु अजूनही सुधारणा करण्यास वाव दिसतो आहे.

बीजे निम्मित्त मुख्य सोहळा मुख्य वैकुंठ गमन मंदिरात पार पडणार आहे. तिथेच मोठ्या समस्या आहेत. आवारात पाणी साचतयं. त्यामुळे पाय घसरून भाविक जाग्यावर पडू शकतात. तुकाराम महाराजांच्या भित्ती चित्रकावर (म्युरल्स) जाळी आणि धूळ पसरलेली आहे. समोर अर्धवट अवस्थेत गवत असून उर्वरित भागात माती, दगड, पाईपाचे तुकडे आणि पालापाचोळा पसरलेला आहे.

सभा मंडपात सिमेंट कोबा अथवा फरशी बसविलेली नाही. त्यामुळे माती उखडली आहे. तिथे कुत्र्यांचा कळप बिनधास्तपणे फिरताना दिसतोय. सभा मंडपा समोरच्या मोकळ्या जागेत लोखंडी सांगाडा तसेच अडगळीत लोखंडी बाक धूळ खात पडून आहे. आवारात माती आणि दगड पडलेले आहेत. इंद्रायणी नदीतून पूर्णपणे जलपर्णी काढलेली नाही. गाथा मंदिराच्या मागे मोठ्या प्रमाणावर जलपर्णी आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविकांना डासांचा त्रास होणार आहे. बीज सोहळ्याच्या आधी समस्या दूर करण्याची मागणी भाविकांकडून होत आहे.
















