न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२४) :- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांना एका कारमध्ये ५० लाख रुपयांची रोकड मिळून आली. मंगळवारी (दि. २६) सायंकाळी पाचच्या सुमारास उर्से टोल नाक्यावर शिरगाव ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार उघडकीस आला.
पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत नऊ ठिकाणी नाकाबंदी सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाका येथे वाहन तपासणी करत असताना पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यांना ५० लाख रुपयांची रोकड मिळून आली.
संबंधित कारचालकाला रकमेबाबत खुलासा विचारला असता त्याला खुलासा करता आला नाही. त्यानुसार, वरिष्ठांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कार ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. आयकर विभागालादेखील याबाबत माहिती देण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत संबंधित चालकाची कसून चौकशी सुरू होती.