न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. २७ मार्च २०२४) :- जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळा आज बुधवारी देहूनगरीत संपन्न होणार आहे. या बीजसोहळ्यासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू नगर पंचायतीसह देहूनगरी सज्ज झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दाखल झाले आहेत.
देहूगाव परिसरात वारकऱ्यांनी ठिकठिकाणी राहुट्या टाकल्या आहेत. पहाटे तीनला काकडा आरती, पहाटे चारला श्री संत तुकाराम शिळा मंदिरात संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, वंशज व वारकरी यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली आहे. पहाटे सहाला वैकुंठगमन स्थान (गोपाळपुरा) येथे श्री संत तुकाराम महाराज महापूजा झाली. सकाळी साडेदहाला मुख्य मंदिरातून पालखीचे वैकुंठगमन मंदिराकडे प्रस्थान (गोपाळपुरा) होईल. तेथील नांदुरकीच्या झाडाखाली सकाळी कीर्तन होईल. दुपारी साडेबाराला पालखी मुख्य मंदिराकडे माघारी निघेल.
मंदिर आवारात त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था असून, कडेकोट पोलिस बंदोबस्त आहे. देहूत प्रवेश करणाऱ्या मार्गावर बॅरिकेट्स लावले असून, गावात वाहनांना प्रवेश बंदी आहे.