न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. मार्च २०२४) :- काळा रंग सूर्यप्रकाश शोषून घेत असल्यामुळे उन्हाळ्यात काळ्या रंगांचे कपडे वापरणे शक्यतो टाळले जाते. न्यायालयात पक्षकारांची बाजू मांडणारे वकील मात्र याला अपवाद ठरतात.
आपल्या पेशाची ओळख सांभाळण्यासाठी दिवसभर त्यांना काळ्या कोटातच वावरावे लागते. तरीही वकिलांना उन्हाळ्यात कोटाचा त्रास होऊ नये, यासाठी १५ मार्च ते १५ जून या तीन महिन्यांच्या कालावधीत काळा कोट न वापरण्याची मुभा देण्यात आली आहे.
उन्हाच्या तीव्र झळा, वाढते तापमान यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. न्यायालयात पक्षकारांची बाजू मांडणाऱ्या वकिलांना काळा कोट हा ड्रेसकोड आहे. त्यामुळे उन्हाळा असो वा पावसाळा, त्यांना तो घालावाच लागतो. न्यायाधीशांपुढे बाजू मांडण्यासाठी येणाऱ्या वकिलाने ड्रेसकोड घातला आहे किंवा नाही, याची दखल घेतली जाते. न्यायाधीशांनी ड्रेसकोड न घातल्यामुळे अनेकदा वकिलांना सुनावल्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत.
कोटाशिवाय वकिलीची कल्पनाही करू वाटत नाही. मात्र, तापमान जास्त असलेल्या, वीजपुरवठा खंडित होणाऱ्या अथवा सोयी, सुविधा नसलेल्या ग्रामीण भागातील वकिलांना या निर्णयाचा फायदा होतो. तर, कोट घालायचा की नाही, हे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ठरते. शहरात पंखे, कुलर असतात. त्यामुळे न्यायालयात उन्हाचा इतका त्रास होत नाही. त्यामुळे बहुतांश वकील उन्हाळ्यातही कोट घालतात, अशा प्रतिक्रिया वकील बांधवांनी दिल्या आहेत.