न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. मार्च २०२४) :- शिरूर लोकसभा मतदारसंघात लोकसभेची लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून खासदार डॉ. अमोल कोल्हे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर अजित पवार गटाकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे संभाव्य उमेदवार आहेत. आज दोन्ही नेते एकमेकांसमोर आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती आहे. यानिमित्ताने खासदार अमोल कोल्हे हे किल्ले शिवनेरी येथे गेले होते. याच वेळी समोरून शिवाजीराव आढळराव-पाटील हेदेखील किल्ले शिवनेरी येथे आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केले.
यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी खासदार अमोल कोल्हे यांना वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतले. तसेच शिवाजीराव आढळराव-पाटील यांनीही अमोल कोल्हे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या आरोग्याची विचारणा करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि पुढे निघून गेले. अमोल कोल्हे यांनी हा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट करत “राजकारण हा पिंड नाही. मात्र, शिवसंस्कार हाच आमचा पिंड”, असे म्हटले आहे.


















