वंचित आघाडी तेलं लावलेला पहिलवान आखाड्यात उतरविण्याची शक्यता?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२४) :- पुणे आणि शिरुरमध्ये उमेदवार दिल्यानंतर आता मावळ लोकसभा मतदारसंघामध्येही वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार दिला जाणार आहे. येत्या दोन दिवसात उमेदवार जाहीर केला जाणार असल्याचे वंचितकडून सांगण्यात आले. मागील निवडणुकीत लाखभर मते घेणाऱ्या वंचितच्या उमेदवारीचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फटका बसू शकतो.
महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली आहे. तर, महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांना उमेदवारी दिली आहे. मावळमध्ये दुरंगी लढत होईल असे वाटत असतानाच आता वंचितही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता असून चूरस निर्माण होईल असे दिसते.
संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघात वंचितला मानणारा लाखभर मतदार आहे. मागीलवेळी घाटाखालील म्हणजेच रायगड जिल्ह्यातील राजाराम पाटील यांनी वंचिकडून निवडणूक लढविली होती. पाटील यांनी तिसऱ्या क्रमांकाची ७५ हजार ९०४ मते मिळवित लक्ष वेधून घेतले होते. त्यांनी चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे १७,२०९ आणि १७,७९४ मते घेतली. त्या खालोखाल पनवेलमध्ये १५,९२६ आणि मावळमध्ये ११,७३१ मते मिळविता आली. उरण आणि कर्जतमध्ये त्यांना दहा हजारांपेक्षा कमी मते मिळाली होती. पाटील यांनी प्रचार केला नव्हता. तरी, देखील ७६ हजार मते मिळाली होती. मावळमध्ये वंचितला मानणारा मोठा मतदार असून ताकदीचा उमेदवार देणार असल्याचे वंचितकडून सांगण्यात आले. मावळमधून लढण्यासाठी सात ते आठ जण इच्छुक आहेत. दोन दिवसात ताकदीचा उमेदवार जाहीर करण्यात येईल, असं सूत्रांकडून समजले आहेत.













