न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२४) :- शिरूर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने उमेदवारीबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या त्यांच्या उमेदवाराचे तिकीट रद्द करण्यात आले आहे.
शिरूरमधून मंगलदास बांदल यांना वंचित बहुजन आघाडीने संधी दिली होती. पण त्यांनी पक्षाच्या निर्णयाला विरोध केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याबद्दलची माहिती वंचितच्या सोशल मीडिया हॅन्डलवरून दिली.
सोशल मिडियावर पोस्ट करत माहिती देण्यात आली. यामध्ये म्हटले आहे की, ‘वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुरलोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते. बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे.’











