- नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; वन अधिकाऱ्यांकडून सीसीटीव्हीचं जाळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ एप्रिल २०२४) :- दिघी, च-होली परिसरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शनिवारपासून वनविभागाच्या पथकाने शोधाशोध सुरू केली आहे. बिबट्याचा माग काढण्यासाठी रविवारी या भागात कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
आळंदी-पुणे रस्त्यावरील दिघी, च-होली परिसर आहे. त्या भागामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर शेती आहे. गेल्या दोन दिवसांपासून या भागात बिबट्या दिसून आल्याच्या तक्रारी नागरिकांनी वनविभागाकडे केल्या होत्या. गायत्री मंदिराच्या परिसरामध्ये तसेच जवळच असणाऱ्या रेड झोनच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे वाढलेली आहेत. त्या जंगलामध्ये गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य आहे, असे नागरिकांनी सांगितले. एका ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्या आढळून आला आहे. अद्यापपर्यंत बिबट्याने कोणावर हल्ला केल्याची माहिती नाही.
ज्या परिसरात बिबट्या आढळून आला आहे. त्या परिसरातील शेतामध्ये वनविभागाच्या वतीने कॅमेरे लावले आहे. त्या माध्यमातून बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. रविवारीपासूनच वनविभागाचे परिक्षेत्र वन अधिकारी अनिल राठोड यांच्यासह आठ जणांचे पथक या परिसरामध्ये तपासणी करत आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या परिसरामध्ये बिबट्याचे वास्तव्य असल्याच्या तक्रारी आहेत. त्या ठिकाणी म्हणजेच साई मंदिरापासून च-होलीपर्यंतच्या शेतीच्या परिसरामध्ये तपासणी सुरू आहे. तसेच अनेक ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. त्यातून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
– अनिल राठोड, वन अधिकारी…