- भाजपसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता..
- स्थानिक पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांमध्ये शीतयुद्ध?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२४) :- मावळ व शिरूर या लोकसभा मतदारसंघात ज्या पक्षाच्या विरोधात इतके वर्षे लढलो, त्याच पक्षांसोबत काम करायची वेळ आल्याने माजी नगरसेवकांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या रणसंग्रामानंतर लगोलग विधानसभा तसेच, महापालिका निवडणुकीस सामोरे जावे लागणार आहे. आपल्या हकाच्या भागातील राजकीय समीकरणे बिघडू नये म्हणून स्थानिक पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते सावध पावले टाकत आहेत.
मावळ लोकसभेत शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील यांच्यात सरळ लढत होणार असल्याचे चित्र आहे; मात्र ज्यांच्या नावाने खडे फोडले, ज्यांच्या विरोधात आतापर्यंत लढलो. आता त्यांच्यासोबत काम करावे लागणार असल्याने भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसची गोची झाली आहे. कोणती भूमिका घ्यायची, असा संभ्रम निर्माण झाला आहे. संघटनेतील सक्रिय पदाधिकारी व माजी नगरसेवक संभ्रमात पडले आहेत.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे शहरातील दोन मोठे पक्ष आहेत. ते यापूर्वी एकमेकांविरोधात लढले आहेत. कड़वा विरोध करीत फेब्रुवारी २०१७ च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीकडून भाजपने सत्ता खेचून घेतली. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक बड़े नगसेवक फोडून आपल्या पक्षात घेतले. महापालिकेत भाजपचे ७७ आणि राष्ट्रवादीचे ३६ नगरसेवक होते. विरोधातील एकत्रित असलेल्या राष्ट्रवादीने अनेक आंदोलने व मोर्चे करून भाजपला हैराण करून सोडले होते.
आता महायुतीत भाजप व राष्ट्रवादीला शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा प्रचार करावा लागणार आहे. मागील युतीत शिवसेनेचे भाजपने काम केले होते. ती युती नंतर तुटली. पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत तसेच, महापालिकेसाठी महायुती कायम असणार हे स्पष्ट नाही. गेल्यावेळेचे वैरी असलेले आता एकत्र आल्याने कसे काम करायचे, याची चिंता अनेकांना सतावत आहे. महायुती जिंकण्यासाठी तीनही पक्षांना कसब दाखवावे लागणार आहे. वाद बाजूला ठेवून एकत्रित काम करावे लागणार आहे. आता लोकसभेत धनुष्यबाणाचे काम केले. मग, तोंडावर असलेल्या विधानसभा आणि त्यानंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीत कशी मते मागायची हे कोडे जटील बनत चालले आहे; तसेच राज्यातील राजकीय स्थिती भविष्यात कशी असेल, यांचा अंदाजही बांधता येत नाही. त्यामुळे थेट प्रतिक्रिया न देता आणि सक्रियपणे काम न करता सावध पावले टाकली जात आहेत. होणारे जागा वाटप तसेच, नेत्यांचे आदेश लक्षात घेऊन निर्णय घेण्याचे काहींनी ठरवले आहे. दुसरीकडे, काही नाराज मंडळी दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी योग्य संधी व वेळेची प्रतीक्षा केली जात आहे.
मावळ लोकसभेचे तिकीट भाजपलाच मिळावे यासाठी स्थानिक पदाधिकारी आडून बसले होते. त्या संदर्भात लोणावळा येथे झालेल्या बैठकीत तसा ठराव करण्यात आला होता. मावळ लोकसभेत सहापैकी भाजपचे दोन व संलग्न एक अपक्ष असे एकूण तीन आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे दोन आमदार आहेत. तर, शिवसेना शिंदे गटाचा एकच आमदार आहे. मावळात भाजपाची सर्वाधिक ताकद असल्याने ती जागा पक्षाने स्वतः लढवावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली होती. त्यामुळे ऐनवेळी ती जागा भाजपला सुटण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. तर, शिरूरच्या जागेवर अजित पवार गटाने दावा केल्यामुळे ती जागा राष्ट्रवादीला मिळाली. दरम्यान लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करण्याचा काहींनी निर्णय घेतला आहे. स्थानिक राजकीय गणिते लोकसभा निवडणुकीवरून स्पष्ट होत नाही. विधानसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवड शहराचे संपूर्ण राजकीय चित्र समोर येणार आहे. तोपर्यंत काहींनी थांबण्याचे पक्के केले आहे.
नात्यागोत्याचा प्रभाव ?
पिंपरी-चिंचवड व मावळ शहरात नात्यागोत्याचे राजकारण अजून टिकून आहे. पक्ष बाजूला ठेवून नात्यातील उमेदवाराला जिंकून देण्यासाठी मंदिरात जाऊन शपथा घेतल्या जातात. पिंपरीगावातील माजी महापौर संजोग वाघेरेंना नात्यागोत्याचा मोठा लाभ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीत नात्यागोत्याचा प्रभाव महत्त्वाचा ठरणार आहे. दुसरीकडे, पक्षविरोधी काम केल्याची बाब उघड झाल्यास विधानसभा तसेच, महापालिका निवडणुकीत पक्षश्रेष्ठी व मतदारांच्या रोषाला इच्छुकांना सामोरे जावे लागू शकते.













