न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचा तसेच पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरील आक्षेपार्ह मजकुराचा निषेध करत तो तातडीने हटवून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
यावेळी योगेश बहल म्हणाले की, महिलांचा अपमान करणारी भाषा महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला शोभणारी नाही. राजकारणात मतभेद असू शकतात, मात्र महिलांच्या सन्मानाशी तडजोड होऊ शकत नाही. काँग्रेसने वापरलेले शब्द केवळ एका महिला नेत्याचाच नव्हे, तर सर्व कर्तृत्ववान महिलांचा अवमान असल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित सोशल मीडिया पोस्ट तातडीने हटवून जाहीर माफी मागण्याची मागणीही त्यांनी केली.
या आंदोलनात विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, विठ्ठल (नाना) काटे, सीमा सावळे, वैशाली घोडेकर, कविता आल्हाट, राहुल भोसले, फजल शेख, शाम लांडे, सारंग कामतेकर, शेखर काटे, वर्षा जगताप यांच्यासह पक्षाचे अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी, महिला आघाडी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.


















