- बाबासाहेब त्रिभुवन यांच्या शिक्षण प्रशासनाला सूचना…
- सहकाऱ्यांना नेतृत्वाची संधी दिल्याने सभापती अभिषेक बारणे यांचे सर्वत्र कौतुक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता उंचावून विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने ठोस नियोजन करावे. खासगी भागीदारीत (पीपीपी) चालविल्या जाणाऱ्या पाच शाळांमध्ये अवलंबिल्या जाणाऱ्या अध्यापन पद्धती, शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त, शिक्षकांची कार्यपद्धती आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा सादरीकरणाच्या माध्यमातून स्थायी समितीसमोर मांडावा, असे स्पष्ट निर्देश स्थायी समितीचे तात्पुरते सभापती बाबासाहेब त्रिभुवन यांनी शिक्षण विभागाला दिले.
महापालिकेच्या कै. मधुकर पवळे सभागृहात बुधवारी (ता. 5) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या सूचना देण्यात आल्या. विशेष म्हणजे, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान सदस्य बाबासाहेब त्रिभुवन यांच्याकडे सोपवत लोकशाही परंपरेला बळकटी देणारा आणि सहकाऱ्यांना नेतृत्वाची संधी देणारा निर्णय घेतला. बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिभुवन यांनी विविध विषयांवर प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या. बारणे यांच्या कार्यकाळात सदस्यांना नेतृत्वाची संधी देण्याची परंपरा कायम ठेवण्यात आली असून, आतापर्यंत तब्बल तीन सदस्यांना स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्याचा मान मिळाला आहे. त्यांच्या या उदारमतवादी आणि सर्वसमावेशक भूमिकेची बैठकीतही चर्चा झाली.
बैठकीदरम्यान महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वस्तूरूपाने न देता थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेद्वारे आर्थिक स्वरूपात देण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने मंजुरीसाठी सादर केला होता. मात्र, केवळ साहित्य वितरणाच्या प्रक्रियेपेक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला अधिक महत्त्व देण्याची भूमिका घेत सभापती बाबासाहेब त्रिभुवन यांनी हा प्रस्ताव तत्काळ मंजूर न करता तो फेटाळला.
पाच शाळांच्या प्रगतीची माहिती द्या…
सभापती त्रिभुवन यांनी शिक्षण विभागाकडून महापालिकेच्या शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती मागविली. तसेच, आकांक्षा फाऊंडेशनच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या पाच शाळांमध्ये कोणती अध्यापन पद्धती वापरली जाते, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी कोणते उपक्रम राबविले जातात, शिस्तबद्ध वातावरण कसे निर्माण करण्यात आले आहे, शिक्षकांची निवड व प्रशिक्षण कसे केले जाते आणि त्या शाळांचे निकाल व गुणवत्ता निर्देशांक काय आहेत, याचे सादरीकरण करण्याचे निर्देश दिले.
पटसंख्या घसरण्याची कारणे कोणती ?
महापालिकेच्या सर्व शाळांमधील पटसंख्या घटण्यामागील कारणांचा सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करण्यासही त्यांनी प्रशासनाला सांगितले. विद्यार्थी आणि पालकांचा महापालिकेच्या शाळांवरील विश्वास वाढविण्यासाठी गुणवत्ता, आधुनिक शिक्षणपद्धती, पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक वातावरणात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

















