न्यूज पीसीएमसी नेटवर्क
कासारवाडी (दि. ०५ ऑगस्ट २०२६) :- कासारवाडीतील गुलीस्तान नगर परिसरात जुन्या वादातून एका २४ वर्षीय तरुणावर सिमेंट ब्लॉकने हल्ला करून त्याच्या बुलेट दुचाकीची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ३ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ ते पावणेनऊच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर घडली. याप्रकरणी अरबाज ताज शेख (वय २४, व्यवसाय – फॅब्रिकेशन, रा. गुलीस्तान नगर, कासारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, अरबाज शेख हे त्यांच्या बुलेट दुचाकीवर बसून मोबाईलवर लुडो गेम खेळत असताना आरोपी अरबाज कुरेशी, तरुण (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) आणि त्यांचे दोन अनोळखी साथीदार तेथे आले. जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी सिमेंट ब्लॉक फेकून मारहाण केली. तसेच बुलेट दुचाकीवर दगड आणि धारदार हत्याराने वार करून वाहनाचे नुकसान केले.
या गोंधळादरम्यान फिर्यादीची आई भांडण सोडविण्यासाठी आली असता, आरोपींपैकी एका अनोळखी व्यक्तीने तिला धक्काबुक्की करून घटनास्थळावरून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३२४(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार पवार पुढील तपास करीत आहेत.


















