- पुण्यात सर्वत्रच अनधिकृत प्लॉटींगचा सुळसुळाट..
- प्लॉट विक्रीच्या जाहिरातींमुळेही होतंय कायद्याचं उल्लंघन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२४) :- राज्यात महारेरा नोंदणी क्रमांकाशिवाय अनेक ठिकाणी प्लॉट्स पाडून जाहिराती देऊन विक्री होत असल्याचे महारेराच्या निदर्शनास आले आहे. ही बाब गंभीर असून, महारेरा’ने या नियम उल्लंघनाची दखल घेतली आहे. महारेरा नोंदणी क्रमांकाशिवाय जाहिराती करणाऱ्या राज्यातील काही विकसकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. प्लॉट पाडून विक्रीसाठीही महारेराची नोंदणी असणे बंधनकारक आहे. त्यात पुणे विभागातील काही विकसकांचा देखील समावेश आहे.
शहरी भागात महारेरा नोंदणीशिवाय प्लॉट विक्रीचे प्रमाण नगण्य असून, शहरांजवळच्या विकसनशील भागात आणि ग्रामीण भागात अशा प्रकल्पांचे प्रमाण जास्त आहे. अशा प्लॉट प्रकल्पांना नोंदणी क्रमांक देताना महारेरा इमारतींच्या प्रकल्पांबाबत जशी काळजी घेते, तशीच काळजी घेते. यातही आर्थिक, वैधता आणि तांत्रिक अशी त्रिस्तरीय पातळीवर छाननी केली जाते. यात स्थानिक नियोजन प्राधिकरणांकडून संबंधित प्रस्तावित प्रकल्पाला मिळालेली मंजुरी प्रवर्तकाला सादर करावी लागते. स्थानिक प्राधिकरण त्या प्रकल्पाच्या बिन-शेती प्रमाणपत्राशिवाय (एनए) मालकी, भूखंडाचा आकार, एकूण भूखंडाच्या आणि प्लॉटच्या सीमारेषा या बाबी पाहतेच. या शिवाय भोगवटा प्रमाणपत्र देताना पाणीपुरवठा, रस्ते, मलनिस्सारण, सार्वजनिक सोयी सुविधा अशा नागरी सुविधा अत्यावश्यक असतात, त्याच धर्तीवर या प्रकल्पांनाही या सर्व सोयी- सुविधांची तरतूद करावी लागते, दाखवावी लागते, महारेरा काटेकोर छाननी करून या सर्व बाबींची खात्री करून घेतल्याशिवाय नोंदणी क्रमांक देत नाही.
नागरिकांनो, नोंदणी नसलेले प्लॉट घेऊच नका..
प्रकल्प महारेराकडे नोंदणीकृत असेल, तर विकसकांना स्थावर संपदा कायद्यानुसार ग्राहकहिताच्या दृष्टीने अनेक बाबी कराव्या लागतात. दिलेल्या हमीची पूर्ण पूर्तता करावीच लागते. नोंदणी क्रमांक देताना महारेरा या सर्व बाबींची खात्री करून घेते. त्यामुळे स्वहितास्तव महारेराकडे नोंदणीकृत नसलेल्या अशा प्लॉटच्या प्रकल्पातून फसवणूक होऊ नये, यासाठी प्लॉट घेण्याचे टाळावे, असे आवाहन महारेराने केले आहे.
भूखंड (प्लॉट), सदनिका आणि इमारतीच्या विक्रीसाठी जाहिरात करण्यापूर्वी महारेरा नोंदणी क्रमांक घेणे अत्यावश्यक आहे. असे असूनही प्लॉटसच्या प्रकल्पासाठी महारेरा नोंदणी क्रमांक न घेताच जाहिरात करणे हे कायद्याचे उल्लंघन तर आहेच, शिवाय गुंतवणूकदारांच्या हक्कांवर गदा आणणारेही आहे. स्थावर संपदा क्षेत्रातील अशा प्रकारची अनियमितता खपवून घ्यायची नाही, याबाबत महारेरा ठाम आहे. ही कारवाई याच प्रक्रियेचा भाग आहे.
– अजोय मेहता, अध्यक्ष, महारेरा…