न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी ते डांगे चौक–चिंचवड मार्गावरील बिर्ला हॉस्पिटलजवळील पुलाचे संरक्षक कठडे मुसळधार पाऊस व पुराच्या पाण्यामुळे तुटल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नगरसेवक तथा गटनेते विश्वजीत श्रीरंग बारणे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देत कठडे तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.
बारणे यांनी निवेदनात म्हटले आहे की, या पुलावरून दररोज हजारो वाहने तसेच शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पादचारी प्रवास करतात. तुटलेल्या कठड्यांमुळे कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
संबंधित पुलाची तातडीने पाहणी करून तुटलेले कठडे दुरुस्त करावेत तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षाविषयक उपाययोजना त्वरित राबवाव्यात, अशी मागणी विश्वजीत बारणे यांनी केली आहे.


















