न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सुधारित विकास आराखड्यातील आरक्षणांबाबतच्या हरकतींवर आज पहिल्या दिवशी एकूण २०८ हरकतींची सुनावणी पार पडली. नागरिकांच्या भावना, सामाजिक गरजा आणि भविष्यातील शहर विकासाचा समतोल राखत प्रत्येक हरकतीची सखोल दखल घेतली जात असल्याची माहिती प्रारूप सुधारित विकास योजना नियोजन समितीचे सदस्य तथा स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी दिली.
बारणे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर भिमसृष्टी (पुतळा) शेजारील सर्व्हे क्रमांक २/२० (पोलीस आरक्षण) आणि सर्व्हे क्रमांक २/२४ (बस टर्मिनल) येथील प्रस्तावित आरक्षणे पूर्णपणे रद्द करून ती जागा ‘सांस्कृतिक कामासाठी भिमसृष्टी मैदान’ म्हणून अधिकृतपणे आरक्षित करण्याची नागरिकांची प्रमुख मागणी आहे. त्याचप्रमाणे भिमसृष्टीमागील सर्व्हे क्रमांक २/१९ मधील जागेवरील म्युनिसिपल पर्पज (एमपी) अंतर्गत असलेली इतर सर्व आरक्षणे रद्द करून ती जागा केवळ ‘त्यागमूर्ती माता रमाई स्मारक’ उभारण्यासाठी राखीव ठेवण्याबाबतही सकारात्मक सूचना प्राप्त झाल्या आहेत.”
“हा विषय केवळ विकास आराखड्यापुरता मर्यादित नसून सामाजिक अस्मिता, ऐतिहासिक वारसा आणि नागरिकांच्या भावनांशी निगडित आहे. त्यामुळे प्रत्येक सूचना आणि हरकतीचा गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असेही बारणे यांनी स्पष्ट केले.
नागरिकांनी मांडलेल्या सूचनांना सुनावणीदरम्यान सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण होते. नागरिकांच्या सहभागातून विकास आराखडा अधिक लोकाभिमुख आणि समाजहिताचा व्हावा, हा महापालिकेचा प्रयत्न असल्याचेही बारणे यांनी सांगितले.
पुढील टप्प्यात उर्वरित हरकतींवरही नियमानुसार सुनावणी घेऊन त्यावर निर्णय प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

















