- ६७७ वाहन चालकांविरोधात खटला तर, चाळीस लाखांचा दंड वसूल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल २०२४) :- पिंपरी चिंचवड वाहतुक शाखेमार्फत (दि. ०६/०४/२०२४ ते १२/०४/२०२४) दरम्यान राँग साईड व अल्पवयीन वाहनचालकां विरोधात विशेष मोहिम राबविण्यात आली होती.
बरेचसे पालक हे आपल्या अल्पवयीन पाल्यास वाहन चालविण्याचा परवाना नसताना दुचाकी वाहन चालविण्यास देतात. त्यामुळे या वाहन चालकांकडुन किरकोळ व गंभीर स्वरुपाचे अपघात होवून मुलांचे भावी आयुष्यावर गंभीर स्वरुपाचा परीणाम होत असतो. तसेच नागरीक आपल्या ताब्यातील वाहन चालविताना रस्त्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन राँग साईडने वाहन चालवित असल्यानेदेखील अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात जिवीत तसेच वित्तहानी होत असल्याने त्यास प्रतिबंध करण्याकरीता पिंपरी चिंचवड वाहतुक शाखा प्रयत्न करीत आहे.
दरम्यान पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशाने व अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात विना परवाना वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरोधात (अल्पवयीन १६ वर्षाखालील मुले) तसेच परवाना नसताना वाहन चालविण्यास देणारे वाहन मालकांविरोधात व राँग साईड (विरुद्ध दिशेने) वाहन चालविणारे वाहन चालकांविरोधात दिनांक ०६/०४/२०२४ ते १२/०४/२०२४ दरम्यान पिंपरी चिंचवड वाहतुक शाखेकडुन विशेष मोहिम राबविण्यात आली.
विना परवाना वाहन चालविणारे तसेच परवाना नसताना वाहन चालविण्यास देणाऱ्या एकुण ५७१ वाहन चालक मालकांविरोधात पिंपरी चिंचवड वाहतुक विभागांमार्फत कारवाई करुन एकुण ४१,४०,००० रुपये एवढा दंड आकारण्यात आलेला आहे. तसेच राँगसाईड वाहन चालविणारे चालकांविरोधात एकुण ६७७ वाहन चालकांविरोधात मा. न्यायालयात खटले दाखल करण्यात आले असुन यापुढे देखील अशाच प्रकारे वेगवगळ्या हेडखाली वाहतुक शाखेमार्फत विशेष मोहिम राबवून कारवाई करण्यात येणार आहे.
नागरीकांनी वाहतूक नियमांचे पालन करुन त्यांच्यावर होणारी दंडात्मक तसेच न्यायालयीन कार्यवाही टाळावी, असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.