- सोमवारी मतदान; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलाय हा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दिनांक : ११ मे २०२४) :- महिनाभर सुरू असणारी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे मतदान सोमवारी होणार असून, प्रचाराची सांगता आज शनिवारी सायंकाळी सहाला झाली.

भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय-रासप यांची महायुती आणि काँग्रेस-शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यातच खरी लढत होणार आहे. दरम्यान वंचित बहुजन विकास आघाडीसह अपक्षांनी पदयात्रा, कोपरा सभा, मतदार संवाद करून प्रचाराची सांगता केली. आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १६ मार्चपासून सुरू झाली. अर्ज दाखल करण्याची मुदत २५ एप्रिलपर्यंत होती. २९ एप्रिलला माघारीचा दिवस होता. उमेदवारी अर्ज अंतिम झाल्यानंतर रणधुमाळीला सुरुवात झाली. मावळमधून ३३ तर शिरूर लोकसभेतून ३२ उमेदवार समोरासमोर आहेत. प्रचाराची सांगता आज झाली. निवडणुकीतील शेवटचा दिवस हा प्रचार आणि रोड शोचा होता.
निवडणूक आयोगाच्या वतीने प्रचाराची मुदत संपल्यानंतर राजकीय फ्लेक्स काढण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. चिंचवड, मोरवाडी, भोसरी, आकुर्डी, थेरगाव, पिंपरी, दापोडी परिसरात असणारे फ्लेक्स काढले जात आहेत. वाहनांवरील पोस्टरही काढण्याची कार्यवाही सुरू होती. तसेच राजकीय पक्षांनी तयार केलेले रथ त्यावरील चिन्ह काढण्याची तयारी सुरू होती.
निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने उपाययोजना केल्या जात असून मुदत संपल्यानंतर प्रचार करणा-यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहे. तसेच प्रलोभने दाखविणारे, पैसे वाटप करणा-यांवरही आयोगाचे लक्ष आहे. तसेच पोलिसांच्या वतीने तयार केलेल्या भरारी पथकांच्या वतीने जाहिर प्रचार संपल्यानंतर राजकीय प्रचार करणारे फ्लेक्स काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पोलिस आणि निवडणूक आयोगाची यंत्रणा संयुक्तपणे काम करीत आहे. तसेच राजकीय पक्षांनी आचारसंहितेचा भंग होणार नाही. याची दक्षता घेणे अपेक्षीत आहे. तसेच कोणीही आचारसंहितेचा भंग करू नये, असे आढळल्यास गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला आहे.
सोमवारी (दि. १३) रोजी मावळ लोकसभेसाठी मतदान होणार आहे. मदत संपल्यानंतर आज सायंकाळी ६ वाजता प्रचार थांबवण्यात आला आहे. नागरिकांनी मतदानासाठी मतदान कार्डशिवाय जाहीर केलेल्या १२ पैकी एक पुरावा घेऊन मतदानासाठी जावे. डीजी लॉकर मधील सोफ्टकोपी चालणार नाही. मतदान केंद्रात मोबाईल वापरण्यास प्रतिबंध आहे. फोटो काढल्यास थेट गुन्हा दाखल होईल.
– मा. दीपक सिंगला (निवडणूक निर्णय अधिकारी, मावळ लोकसभा)…












