- निवडणुका सुरळीत, शांततेत पार पडण्यासाठी कलम १४४ लागू..
- मतदान केंद्रावर या बाबींसाठी निवडणूक आयोगाकडून निर्बंध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मे २०२४) :- तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी पुणे, शिरुर व मावळ या मतदारसंघातील काही भाग पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत आहे. निवडणुका सुरळीत, शांततेत पार पडण्यासाठी आयुक्तालयाच्या हद्दीत फौजदारी प्रक्रिया दंड संहिता (सीआरपीसी) कलम १४४ प्रमाणे मनाई आदेश लागू केले आहेत. त्यानुसार मतदान केंद्रांपासून ठराविक अंतरापर्यंत अनेक बाबींना निबंध असणार आहेत.
हे आदेश मंगळवारी (दि. १४) रात्री बारापर्यंत लागू असतील. भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद आहे. कायद्याचे उल्लंघन होईल, असे कोणतेही कार्य न करता नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले आहे. निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.
मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मतदान केंद्रावर खालील बाबींसाठी निवडणूक आयोगाकडून निर्बंध आहेत….
- मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात तसेच मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रिसायडिंग अधिकारी, निवडणूक कामकाज संदर्भाने नेमलेले शासकीय व्यक्ती, कायदा व सुव्यवस्था बंदोबस्तासाठी नेमलेले शासकीय व्यक्ती ज्यांना निवडणूक संदर्भाने संपर्क करणे आवश्यक आहे. यांच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना मोबाईल फोन, स्मार्ट फोन वापरण्यास मनाई आहे.
- मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात तात्पुरत्या स्वरुपाचे पक्ष कार्यालय कोणत्याही धार्मिक, शैक्षणिक आस्थापनेत किंवा अतिक्रमण करून उभारण्यास मनाई आहे.
- संरक्षण प्राप्त व्यक्त्तींना मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात सुरक्षा रक्षकासह प्रवेश करण्यास मनाई आहे.
- मतदान केंद्राच्या २०० मीटर आतमध्ये इलेक्शन बुथ लावता येणार नाही. एका इमारतीत एकापेक्षा जास्त मतदान बुथ असतील तरी देखील त्या इमारतीसाठी एका उमेदवाराला एकापेक्षा जास्त बुथ लावता येणार नाही.
- मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या २०० मीटर क्षेत्रामध्ये प्रचार करण्यास निवडणूक आयोगाच्या वतीने मनाई करण्यात आली आहे.
- लाऊड स्पीकर, मेगाफोन, आरडाओरडा करणे, गोंधळ करणे, दुवर्तन करणे, अशा प्रकारास मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आहे.
- मतदान समाप्तीकरिता निर्धारित केलेल्या वेळेच्या ४८ तास आधीपासून ज्या मतदारसंघात मतदान होणार आहे तेथे मतदार नसलेले राजकीय कार्यकर्ते वा प्रचार कार्यकर्ते त्यांना त्या मतदारसंघात थांबण्यास मनाई असेल.
- मतदान समाप्तीकरिता निर्धारित केलेल्या वेळेच्या ४८ तास आधीपासून प्रचार करण्याच्या उद्देशाने मेसेज पाठविण्यास मनाई आहे.















