न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२४) :- महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या पुणे विभागीय कार्यालयाच्या पुढाकाराने १५ ते १९ मे या कालावधीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. तरी आंबा उत्पादक शेतकरी ते थेट ग्राहक योजनेंतर्गत ग्राहकांनी आंबा खरेदीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी केले आहे.
आंबा महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत. महोत्सवामध्ये २० स्टॉलची उभारणी करण्यात येत असून, महोत्सवाची वेळ सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत राहील, अशी माहिती मंडळाचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांनी दिली.
गेल्या २२ वर्षांपासून आंबा महोत्सवाचे आयोजन पणन मंडळाकडून करण्यात येत असून, कोकणातील उत्तम, दर्जेदार व नैसर्गिकरीत्या पिकविलेल्या हापूस आंब्याच्या खरेदीची सुवर्णसंधी पिंपरी- चिंचवडमधील ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. शिवाय, थेट शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांकडून थेट विक्री होणाऱ्या आंब्याची खरेदी करण्याची संधी असल्याची माहिती मंडळाचे पुणे विभागीय उपसरव्यवस्थापक राजेंद्र महाजन यांनी दिली.











