न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२४) :- मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत झालेल्या मतदानात मावळ लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात उरण, मावळमध्ये सर्वाधिक मतदान झाले, तर पिंपरी विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत फक्त ५२ टक्के मतदान झाले. त्यामुळे दीड महिना अधिकाऱ्यांनी जनजागृती करूनही मतदारांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
मावळ लोकसभेतर्गत येणाऱ्या पुणे आणि रायगड जिल्हा प्रशासनाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली, त्यासाठी विविध उपक्रमही राबविले. तरीही मतदानाच्या दिवशी टक्केवारी वाढविण्यात अपयश आले.
जवळपास ५० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्कच बजावला नाही किंवा बजावता आला नाही, राजकीय पक्षांपेक्षाही निवडणूक आयोगाच्या प्रशासनाकडे मोठी आणि सक्षम यंत्रणा असतानाही ती यंत्रणा मतदारांपर्यंत पोहोचलीच नाही का? असा सवाल मतदारांमधून उपस्थित होऊ लागला आहे.











