न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे २०२४) :- मावळ आणि शिरूर लोकसभा निवडणुकीकरिता महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या दोन्ही मतदारसंघात १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. मात्र, अद्यापही महापालिका अधिकारी निवडणूक डयूटीवर असल्याने महापालिका मुख्यालयात शुकशुकाट जाणवत आहे. तर अनेक विकासकामे व नोकरभरती प्रलंबित असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहर मावळ व शिरुर या दोन लोकसभा मतदार संघांच्या हद्दीत येते. शहरात एकूण एकूण तीन विधानसभा मतदार संघ आहेत. यापैकी चिंचवड व पिंपरी विधानसभा मतदार संघाकरिता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे महापालिका मुख्यालयासह आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मनुष्यबळाची कमतरता भासत होती. चौथ्या टप्यात १३ जूनला मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर हे अधिकारी व कर्मचारी महापालिकेत त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणे अपेक्षित होते. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत म्हणजे ४ जूनपर्यंत लागू असणार आहे. त्यामुळे हे सर्व अधिकारी व कर्मचारी आता ४ जूनपर्यंत इलेक्शन ड्युटीवर असण्याची दाट शक्यता आहे.
गेली दोन वर्षे महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे मुख्यालयात लोकप्रतिनिधींची उपस्थिती नसल्याने प्रशासनावर वचक राहिलेला नाही. तर लोकसभा निवडणुकीनंतर आता प्रशासकीय राजवटीतही तोचतोचपणा आल्याचे चित्र आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी वेळेवर भेटत नसल्याचे चित्र आहे. परिणामी नागरिकांचा वावरदेखील कमी झाल्याचे जाणवत आहे.
प्रशासकीय राजवटीत लोकप्रतिनिधींना वाव नसल्याने समस्या मांडण्यात मर्यादा येतात. जनसंवाद सभा होत नसल्याने समस्या मांडण्यात अडचणी येत आहेत शिवाय कामाची ऑर्डर दिलेली विकासकामे संथगतीने सुरू आहेत. प्रशासकीय राजवटीत नागरिकांना आपल्या अडचणी व समस्या मांडग्याकरिता महापालिका प्रशासनाने जनसंवाद सभांचे आयोजन केले होते. यामध्ये नागरिकांना आपल्या समस्या मांडता येत होत्या. मात्र, आचारसंहिता लागू झाल्याने या जनसंवाद सभादेखील होत नाहीत. तसेच अधिकारीदेखील भेटत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.












