- आतापर्यंत २० फलकांवर पाडापाडीची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२४) :- अनधिकृत जाहिरात फलक धारकांविरोधात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. नुकत्याच केलेल्या शहरातील अनधिकृत जाहिरात फलक सर्वेक्षणात आढळून आलेल्या २४ बेकायदेशीर जाहिरात फलक धारक, जाहिरात धारक तसेच जागा मालक यांच्यावर भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत कलम ३३६, महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ अंतर्गत कलम ३, महानगरपालिका अधिनियम १८८८ अंतर्गत कलम २४४ आणि २४५ या कलमांतर्गत पिपंरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाहिरात फलक धारकांसमवेत झालेल्या बैठकीत आयुक्त शेखर सिंह यांनी अनधिकृत जाहिरात फलक हटविण्यासाठी फलक धारकांना सूचित केले होते. १५ ते २० मे २०२४ या कालावधीत महापालिकेने अनधिकृत जाहिरात फलक सर्वेक्षण केले त्यामध्ये २४ अनधिकृत जाहिरात फलक आढळून आले. महापालिकेने आतापर्यंत केलेल्या निष्कासनाच्या कारवाईमध्ये शहरातील एकूण २० अनधिकृत जाहिरात फलक हटविण्यात आले आहेत. त्यामध्ये ९ फलक महापालिकेच्या वतीने निष्कासित करण्यात आले असून ११ अनधिकृत फलक स्वत: फलक धारकांच्या वतीने हटविण्यात आले आहेत.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, सर्वेक्षणामध्ये आढळून आलेल्या सर्व अनधिकृत फलक धारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून सर्व अनधिकृत फलक निष्कासित करण्याची कारवाई सुरू आहे. महापालिकेच्या वतीने फलक धारकांसाठी नवीन स्ट्रक्चरल ऑडिट फॉरमॅट
लागू करण्यात येणार आहे. यामुळे जाहिरात फलक धारक शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करू शकतील आणि सुरक्षित जाहिरात फलक उभारण्याची जबाबदारी टाळू शकणार नाहीत. जाहिरात फलकांचे नियमित सर्वेक्षण आणि अनधिकृत फलकांवर होणारी कारवाई ही निरंतर प्रक्रिया असून ती पुढेही सुरूच राहणार आहे. तशा कारवाई सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर म्हणाले, अनधिकृत फलक निष्कासित करणे आणि फलक धारक, जाहिरात धारक तसेच जागा मालकांवर गुन्हा दाखल करणे हे शहरातील नागरी सुव्यवस्था आणि सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने उचलण्यात आलेले महत्वपुर्ण पाऊल आहे. २४ अनधिकृत जाहिरात फलकांसोबत वाढीव ३४१ जाहिरात फलकही सर्वेक्षणात आढळून आले आहेत. या जाहिरात फलक धारकांना फलकाचे आकारमान सुधारण्याबाबत नोटीसा देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली असून फलकाचे आकारमान नियमानुसार बदलले नाही तर फलक हटविण्याची कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती उप आयुक्त संदीप खोत यांनी दिली.
दरम्यान, मागील आठवड्यात १६ मे रोजी मोशी येथे होर्डिंग कोसळल्यानंतर महापालिकेच्या वतीने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जागा मालक, जाहिरात धारकांनी फलक उभारताना सूचनांचे पालन करावे अन्यथा होणार कायदेशीर कारवाई…
जागा मालक, जाहिरात धारक यांनी कोणत्याही खाजगी जागेमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी लोखंडी स्ट्रक्चरवर होर्डिंग बसविताना जाहिरात फलक धारकाच्या हलगर्जीपणामुळे कोणतीही जिवीत किंवा वित्त हानी होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच जाहिरात धारकाने महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जाहिरात फलक बसविताना जाहिरात फलक धारकाने आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून रितसर परवानगी घेतलेली आहे की नाही याची खातरजमा करावी. परवानगी घेतली नसल्यास किंवा नियमांचे उल्लंघन केलेले आढळल्यास संबंधित जाहिरात धारक, जागा मालक तसेच फलक धारकावर कायदेशीर कारवाई केली
जाईल.