न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२४) :- आंब्याच्या हंगामात आणि अन्य फळे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर टाळावा. अन्यथा कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) फळांचे व्यापारी, फळे हाताळणारे, अन्नपदार्थांचे व्यावसायिक तसेच फळे पिकविणाऱ्या केंद्रचालकांना दिला आहे.
कॅल्शियम कार्बाइड वापरताना ते फळांच्या थेट संपर्कात येण्याची तसेच आर्सेनिक आणि फॉस्फरसचे अंश फळांवर शिल्लक राहण्याची शक्यता असते. या धोक्यांमुळे, फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावर अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार बंदी घालण्यात आली आहे. बंदी घातलेल्या कॅल्शियम कार्बाइडवर अवलंबून असून १०० पीपीएमपर्यंत त्याचा वापर केला जाऊ शकतो. याशिवाय, केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समिती ने आंबा आणि इतर फळे एकसमान पिकवण्यासाठी इथेफॉन २३९% एसएल ला मान्यता दिली आहे.
कॅल्शियम कार्बाइडचा वापर किंवा फळे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी पिकवणारे घटक वापरण्याची कोणतीही चुकीची प्रथा ग्राहकांच्या निदर्शनास आल्यास, अशा उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी संबंधित राज्य अन्न सुरक्षा आयुक्तांच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे
फळे पिकवण्यासाठी वापरले जाणारे कॅल्शियम कार्बाइड वातावरणात अॅसिटिलीन वायू सोडते. यामध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरसचे हानिकारक अंश असतात. ‘मसाला’ म्हणूनही ओळखले जाणाऱ्या या पदार्थांमुळे चक्कर येणे, वारंवार तहान लागणे, चिडचिड, अशक्तपणा, गिळायला त्रास होगे, उलट्या होणे आणि त्वचेवर फोड येणे इत्यादी गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. शिवाय, अॅसिटिलीन वायू, तो हाताळणाऱ्यांसाठी देखील तितकाच घातक आहे.