न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२४) :- अठराव्या लोकसभेचे निकाल जाहीर झाले असून महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची दाणादाण उडाली आहे. राज्यात महाविकास आघाडीने ३० तर महायुतीने केवळ १७ जागा जिंकल्या आहेत.
या अपयशामुळे महायुतीतील सर्वच पक्ष बॅकफूटवर ढकलले गेले आहेत. अशातच आता शिवसेनेच्या शिंदे गटातील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदारांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीतील भवितव्याबाबत चिंतेचं वातावरण आहे.
दरम्यान, अजित पवार गटातील आमदार स्वगृही परतण्याच्या तयारीत असल्याचे दावे केले जात आहेत. शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी दावा केला आहे की अजित पवारांच्या गटातील १८ ते १९ आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात आहेत.
रोहित पवार म्हणाले, “अजित पवारांचे १९ आमदार शरद पवाराच्या संपर्कात असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्याचबरोबर त्यांच्या गटातील इतर १२ आमदार हे भाजपाच्या संपर्कात आहेत. ते काय करतील ते पुढच्या काही दिवसांत आपल्याला समजेल. परंतु, या १९ आमदारांपैकी कोणाला आमच्या पक्षात घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही हा निर्णय आमचे पक्षप्रमुख घेतील. आमचं त्यांना (शरद पवार) एकच सागणं आहे की, पक्षाच्या अडचणीच्या काळात जे लोक आपल्याबरोबर निष्ठेने राहिले त्यांनाच पहिलं प्राधान्य द्यायला हवं. जे लोक स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष सोडून गेले त्या लोकांना, तसेच ज्यांना भाजपाने मारून-मुटकून, अडचणीत आणून तिकडे नेलं असेल त्यांना दुसरं प्राधान्य द्यावं. असं आम्हा सर्व कार्यकर्त्यांना वाटतं.”