- सलग तीन वेळा खासदारकीचा किताब जिंकणारे मावळचे खा. बारणे अनलकी कसे?..
- बारणे यांची मंत्रीपदासाठीची उपेक्षा पिंपरी चिंचवडकरांना रुचली?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जून २०२४) :- मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. आज दिल्लीतील राष्ट्रपती भवनात भव्य शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधीसाठी विविध राज्यातील खासदारांना फोन आल्याची माहिती आहे. त्यात महाराष्ट्रातील ६ ते ७ खासदारांची नावे चर्चेत आहेत. पुण्यातून महापौर पदावरून थेट खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाच्या शपथेसाठी फोन आला असल्याची माहिती आहे. महापौर ते खासदार असा प्रवास करणारे मुरलीधर मोहोळ मोदींच्या मंत्रिमंडळात जाणार आहेत.
पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर, वंचितचे वसंत मोरे, एमआयएमचे अनिस सुंडके या चार जणांसह ३५ उमेदवार रिंगणात उभे होते. खरी लढत मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात झाली. या निवडणुकीत मुरलीधर मोहोळ हे १ लाख २३ हजार १६७ मताधिक्याने निवडून आले.
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हे कोथरूड भागात वास्तव्यास आहेत. त्यांनी आरएसएस मधून सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. कोरोनाच्या महामारीत मोहोळ हे पुण्याच्या महापौर पदावर विराजमान झाले होते. त्यांनी त्यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून काम केले आहे. तेव्हापासूनच पुणे शहरात त्यांची प्रतिष्ठा वाढली होती. पु
मुरलीधर मोहोळ यांचा राजकीय प्रवास…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, गणेशोत्सव मंडळाचे सक्रिय कार्यकर्ता, बूथ प्रमुख म्हणून भाजपामध्ये कामाला सुरुवात, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आणि सचिवपदाचीही संधी, संघटनेत ३० वर्षे कार्यरत, सांस्कृतिक-क्रीडा क्षेत्रातही योगदान, २००२, २००७ आणि २०१७ साली कोथरुडमधून नगरसेवक, २०१७ : साली स्थायी समिती धुरा, २०१९ : पुण्याच्या महापौरपदीसंधी, कोरोना काळात विविध पातळ्यांवर भरीव काम, २०२० : अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी, २०२२ : सरचिटणीस, महाराष्ट्र भाजपा, २०२२ : पश्चिम महाराष्ट्राची भाजपाची जबाबदारी, ४ जून, २०२४ : खासदार, पुणे.
मावळ लोकसभेतून तिसऱ्यांदा खासदार झालेले शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांची देखील मंत्रीमंडळात वर्णी लागेल, अशी शक्यता होती. शहरातून मंत्री पदासाठी संधी मिळणार असल्याचे फलक देखील कार्यकर्त्यांनी लावले होते. मात्र, त्यांना शपथविधी सोहळ्यात मंत्रिपदाच्या शपथेसाठी फोन आला नसल्याची माहिती मिळत आहे. सुरुवातीलाच खासदार झालेल्या मोहोळ यांना मंत्रीपदी संधी मिळते मात्र, सलग तीनवेळा खासदार होऊनदेखील बारणे यांची मंत्रीपदासाठी झालेली उपेक्षा पिंपरी चिंचवडकरांना रुचली नसल्याची भावना शहरवासीय व्यक्त करीत आहेत.