- उदाहरणासाठी मग ही बातमी वाचाच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून २०२४) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इंद्रायणीनगर प्राथमिक शाळा येथील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या ड्रेनेज अलर्ट सिस्टीम या प्रकल्पाला कुलेस्ट प्रोजेक्ट या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये कोडींग विथ कमिटमेंट या प्रकारात विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये विजेती ठरणारी महापालिकेची इंद्रायणीनगर शाळा भारतातील एकमेव सरकारी शाळा ठरली आहे.
इंद्रायणीनगर महापालिका शाळेतील नैतिक इहारे, श्रावस्ती गायकवाड आणि निकिता वाघचौरे, निकीता थिटे या विद्यार्थ्यांनी गटारे तुंबून सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत असल्याने बघितले. या समस्येवरील उपाय म्हणून त्यांनीं वॉटर फ्लो सेन्सॉर आणि पायथन कंप्यूटर लॅंग्वेजचा उपयोग करुन प्रकल्प तयार केला. या प्रकल्पाद्वारे गटार तुंबल्याबरोबर अलार्म वाजतो आणि त्या संबंधातील संदेश थेट महापालिकेच्या कार्यालयात तक्रार म्हणून नोंदविला जातो. विद्यार्थ्यांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकन मिळाले आहे.
४३ देशांमधून एकूण ४ हजार ५०० पेक्षा अधिक प्रकल्पांचा होता समावेश..
कुलेस्ट प्रोजेक्ट ही स्पर्धा लंडन स्थित रास्पबेरी पाय जॅम फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे आयोजित केली जाते. या स्पर्धेमध्ये एकूण ४ हजार ५०० पेक्षा अधिक प्रकल्प जगातील ४३ देशांमधून नोंदविण्यात आले होते. त्यामध्ये इंद्राणीनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी समाजाला भेडसावणाऱ्या स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य या समस्येवर यशस्वीरित्या तोडगा काढला आणि शाश्वत विकासाच्या लक्षांवर (SDGs) यशस्वीरित्या कार्य केले म्हणून कोडिंग विथ कमिटमेंट या विशेष पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले, अशी माहिती रास्पबेरी पाय फाउंडेशनने दिली.
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या सर्जनशील क्षमतेचे उत्तम उदाहरण..
कुलेस्ट प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये इंद्रायणी नगरची शाळा ही भारतातून एकमेव सरकारी शाळा विजेती ठरली ही उल्लेखनिय बाब असून विद्यार्थ्यांनी तयार केलेला हा अभिनव प्रकल्प सार्वजनिक आरोग्याच्या गंभीर समस्येचे जलद पद्धतीने निराकरण करण्यासाठी भविष्यात उपयुक्त ठरणार आहे. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या सर्जनशील क्षमतेचे उदाहरण अधोरेखित करत असून त्यांची ही कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
शाळा स्तरावर सदर प्रकल्पाच्या जडणघडणीसाठी मुख्याध्यापक वंदना ईनांन्नी, वर्गशिक्षक सुरेश धायकर, अविनाश बोडखे आणि पाय फाउंडेशनचे प्रशिक्षिका स्नेहा वाहुले व मोनाली कुबडे यांनी विशेष परिश्रम घेतले.