न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ वार्ताहर (दि. ११ जुलै २०२४) :- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार लोणावळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी त्याबाबतचे आदेश काढले. त्यानुसार, साबळे यांनी गुरुवारी (दि. ११) पदाची सूत्रे स्वीकारली.
ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह प्रकरणासह अन्य तक्रारींबद्दल तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांना राज्य शासनाने सोमवारी निलंबित केले. त्यामुळे, परिषदेचे मुख्याधिकारीपद रिक्त झाले होते. हे लक्षात घेऊन त्यांच्या जागी आता अशोक साबळे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
मुख्याधिकारी एन. के. पाटील यांची खासदार श्रीरंग बारणे यांनी नियुक्ती केली होती. मात्र, ही नियुक्ती करताना आमदार सुनील शेळके यांना विश्वासात न घेतले नव्हते. त्यामुळे, बारणे व शेळके यांच्यामध्ये राजकीय मतभेद सुरू झाले होते. ते मतभेद लोकसभा निवडणुकीत संतुष्टात आले. राज्यात महायुतीचे सरकार असून खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके व माजी मंत्री बाळा भेगडे हे तिघे एकत्र आहेत. त्यामुळे, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी कुणाच्या मर्जीतील माणूस येणार याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.















