- भाजपकडे मागितली चिंचवड विधानसभेची उमेदवारी..
- प्रसंगी बंडाचीही तयारी?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२४) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. इच्छुकांकडून निवडणुकीची भर पावसात तयारी सुरू आहे. माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे हे देखील चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. रविवारी (दि. १४) त्यांनी आपल्या कार्यकर्त्यासोबत याबाबत बैठक घेतली. साधारण अडीच हजारांपेक्षा अधिक कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित असल्याची माहिती मिळाली.
दोन टर्म नगरसेवक राहिलेले तसेच दिवंगत आ. स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु विकासाची दूरदृष्टी असलेले शत्रुघ्न काटे हे दोन वेळेस महापौर तसेच एक वेळा स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी पसंतीचे उमेदवार असतानादेखील डावलले गेले. त्यांच्या एवजी इतरांना संधी देण्यात आली. अजून किती काळ पक्ष त्यांच्यावर अन्याय करणार आहे? असा सुरु कार्यकर्त्यांचा बैठकीत निघाला. पक्षाच्या महत्वाच्या पदांवर फक्त एकाच घराण्याची मक्तेदारी आहे का? असा सवाला बैठकीत कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. पक्षाच्या अशा धोरणामुळे पक्षात अंतर्गत नाराजगी वाढली असल्याची कबुली कार्यकर्त्यांनी दिली.
चिंचवडचे आमदार म्हणून विधानसभेवर पाठवण्यासाठी कार्यकर्त्यांनी बैठकीत शंख फुकले. कार्यकर्त्यांनी शत्रुघ्न काटे यांना विधानसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह केला. शत्रुघ्न काटे यांनीही “आता माघार नाही” असा विश्वास देत रणशिंग फुंकले आहे. पक्षाने जर विश्वासात घेऊन संधी दिली नाही तर, लवकरच सर्व कार्यकर्त्यांसह चर्चा करून आपली पुढची रणनीती ठरवणार असल्याचे शत्रुघ्न काटे यांनी बैठकीत स्पष्ट केले आहे.
ऐनवेळी शत्रुघ्न काटे बंडाच्या तयारीत असल्याची माहिती खासगीत कार्यकर्त्यांनी न्यूज पीसीएमसीच्या प्रतिनिधीला दिली आहे.














