न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे २०१९) :- आकुर्डीतील फोर्स मोटर्स कंपनीतील निवृत्त कामगारांनी सन २००४ पासूनचा फरक मिळण्याविषयीचा लढा ‘मरते दम तक’ चालू ठेवण्याचा निर्धार नुकताच कामगारांच्या बैठकीत घेतला.
फोर्स मोटर्स कामगारांच्या प्रश्नांसदर्भात (दि. ३ नोव्हेंबर २०१५) रोजी शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत फोर्स मोटर्सचे अध्यक्ष अभय भारती फिरोदिया व कामगार प्रतिनिधी भरत शिंदे यांच्यासह कामगार कमिटी यांच्याबरोबर समेट झाला. त्याला अनुसरून सन २००४ पासून निवृत्त कामगारांचा फरक मिळेपर्यंत अथवा ‘मरते दम तक’ हा लढा चालूच राहणार असल्याचा दृढ निर्धार फोर्स मोटर्सच्या निवृत्त कामगारांच्या कमिटीने १ मे रोजी घेतलेल्या बैठकीत केला.
बैठकीतील निर्णयानुसार निवृत्त कामगारांचे अमरण उपोषण आंदोलनाचे नियोजन करण्याचे सर्वानुमते ठरले. त्यावेळी या निवृत्त कामगारांवरील अन्यायाबाबत शासन, प्रशासन व संबंधितांना जाब विचारणार असल्याचेही ठरले. एप्रिल २०१६ च्या करारात सन २००४ पासून प्रलंबित १२ वर्षे रखडलेल्या वेतनकराराचा फरक भारतीय कामगर सेनेने सोडल्याबाबत त्यांचा धिक्कार करण्यात आला, अशी माहिती फोर्स मोटर्स निवृत्त कामगार कमिटीचे प्रतिनिधी सुरेश शिंदे यांनी दिली.











