न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे २०१९) :- निगडी परिसराला वाढत्या अतिक्रमणांनी बेजार केले आहे. महाराणा प्रताप पुतळा ते स्वानंद डेअरीपर्यंतच्या पदपथावर अतिक्रमणांनी कब्जा केला आहे. विविध विक्रेते, पधारी यांनी याठिकाणी ठाण मांडले आहे.
त्यांच्याकडून परिसरात अस्वच्छता पसरविली जात असताना महापालिकेच्या अतिक्रमण विभागासह आरोग्य विभागाचेही दुर्लक्ष झाले आहे. रिक्षा चालक बेशिस्तपणे रस्त्यात कोठेही उभे असतात. अधिकृत थांबा सोडून अधिकाधिक प्रवासी मिळविण्यासाठी रिक्षांमध्ये स्पर्धा सुरू असते.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत धरुन ये-जा करावी लागत आहे. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे यामध्ये मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. या अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.











