न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपमध्ये ताळमेळ नसल्याने आणि ढिसाळ नियोजनामुळे शहरावर दिवसाआड पाणीकपात लादली आहे. योग्य नियोजन करून पाणी गळती थांबविली असती, तर ही वेळ पालिकेवर आली नसती, अशी टीका सर्वच गटनेत्यांनी केली आहे.
पवना धरणात २९ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने आणि पावसाळा लांबण्याच्या शक्यतेने पालिकेने सोमवार ( दि. ६) पासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणीटंचाईस व सामोरे जावे लागणार आहे. त्यास पालिका पाणीपुरवठ्याचे अधिकारी व सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी जबाबदार असल्याची टीका विरोधी गटनेत्यांनी केली आहे.
या संदर्भात विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले की, सत्ताधारी भाजपचा नाकर्तेपणा व ढिसाळ नियोजनामुळे शहरावर दिवसाआड पाणी कपात लादली गेली. पवना बंद जलवाहिनी आंद्रा व भामा-आसखेड धरण पाणी योजनेवर राज्यातील सत्ताधारी भाजपला गेल्या ५ वर्षात काहीही करता आलेले नाही. वाढत्या लोकसंख्येनुसार शहराची गरज भागविण्यास पवना धरणातील पाणीसाठा अपुरा ठरत आहे, अशी टीका त्यांनी केली.
शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे म्हणाले की, पूर्वी आणि आताही पालिका प्रशासनाने गटनेत्यांशी चर्चा न करता हा निर्णय घेतला आहे. परस्पर धोरण निश्चित करून ते जाहीर करणे चुकीचे आहे. कपातीला विरोध नाही. पाणी नियोजन करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. पाणीगळती, पाणीचोरी रोखून २४ तास पाणीपुरवठा योजनेला चालना देणे गरजेचे आहे.
मनसेचे गटनेते सचिन चिखले म्हणाले की, सर्व गटनेते व नगरसेवकांना विश्वासात घेउन शहरात पाणीकपातीचे धोरण निश्चित करणे गरजेचे होते. पालिका प्रशासनाने नियोजन न केल्याने दिवसाआड कपातीची वेळ आली आहे. या काळात नागरिकांना पुरेसा दाबाने योग्य वेळ पाणीपुरवठा होणे आवश्क आहे











